वसमत शहरात प्रथमच लिव्हर सोनोग्राफी व पोटाच्या एन्डोस्कोपी तपासणी शिबिराचे आयोजन
कार्यकारी संपादक :- नागेश चव्हाण

वसमत : वसमत शहरात प्रथमच लिव्हर सोनोग्राफी (Liver Fibroscan) आणि पोटाच्या एन्डोस्कोपी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवजीवन हॉस्पिटल, वसमत येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नवजीवन हॉस्पिटलचे डॉ. वैभव पडोळे यांनी शिबिराची माहिती देताना लिव्हरशी संबंधित आजारांचे वेळेवर निदान व तपासणीचे महत्त्व स्पष्ट केले. यकृताच्या आजारांमध्ये सतत थकवा जाणवणे, कावीळ होणे, मळमळ व उलटी, पोट फुगणे, पोटात पाणी साचणे तसेच त्वचा काळसर होणे किंवा पायांवर सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. मद्यपान, मधुमेह, हिपॅटायटिस बी किंवा सी, वजन कमी असणे अथवा अशक्तपणा तसेच फॅटी लिव्हरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी यकृताची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
या शिबिरामध्ये सुप्रसिद्ध पोटविकार, यकृत तज्ज्ञ व एन्डोस्कोपिस्ट डॉ. राजेंद्र हरिहर कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हर फायब्रोस्कॅन व पोटाच्या एन्डोस्कोपी तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक वाघ साहेब यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र कांगणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईडचे अध्यक्ष संजीव बेंडके यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक वाघ साहेब यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ देवदत्त दळवी,सचिन भोसले, माजी नगरसेवक योगेश चेपुरवार, राजेश भोसले, कृष्णा पावडे, प्रसाद लालपोतू, सिद्धेश्वर अल्लमखाने यांच्यासह नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
वसमत शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे यकृत व पोटाशी संबंधित आजारांचे प्राथमिक निदान आणि आवश्यक तपासणीची सुविधा नागरिकांना उपलब्ध झाली.



