ताज्या घडामोडी

पीकविमा योजनेतील नाकारलेल्या अर्जांची फेरपडताळणी सुरू

कार्यकारी संपादक - नागेश चव्हाण

पात्र १३ हजार ९८६ अर्ज पुढील १५ दिवसांत निकाली काढणार
शेतकऱ्यांनी चिंता करू नये- कृषी विभागाचे आवाहन

हिंगोली, दि. 6 नोव्हेंबर : खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ८० हजार ८४० शेतकऱ्यांनी विमा संरक्षणासाठी अर्ज केले आहेत. यापैकी २० हजार ९६८ अर्ज विमा पोर्टलवर नाकारल्याचे दिसून येत असून, या अर्जांची विमा कंपनीमार्फत फेरपडताळणी सुरू आहे. उर्वरित त्रुटी असलेल्या अर्जांबाबत कारणांसह संबंधित शेतकऱ्यांना कळविण्यात येणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यासाठी कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पाच पिकांचा प्रधानमंत्री पीकविमा योजनेत समावेश आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे. सुधारित पीकविमा योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळातील चालू वर्षाचे सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देय राहणार आहे. सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे.

नाकारलेल्या अर्जांपैकी ६ हजार ९८२ अर्ज ३ जुलै २०२६ च्या शासन निर्णयानुसार ०.१० हेक्टरपेक्षा कमी विमा संरक्षित क्षेत्र असल्यामुळे अपात्र ठरले आहेत. उर्वरित १३ हजार ९८६ अर्जांची फेरतपासणी करून पात्र अर्ज पुढील १५ दिवसांत मंजूर करण्यात येणार आहेत. तसेच त्रुटी आढळलेल्या अर्जांबाबत कारणांसह अर्ज पुन्हा सादर करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना कळविण्यात येईल. अशा शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे व संमतीपत्रे सादर करावीत.

योग्य पद्धतीने पीकविमा अर्ज भरलेले आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये. नाकारलेल्या अर्जांची फेरपडताळणी सुरू असून, पात्र अर्जांवर लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button