ताज्या घडामोडी

श्री योगानंद महाविद्यालयात हिंदी दिवस तथा हिंदी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न

कार्यकारी संपादक :- नागेश चव्हाण

वसमत- येथील श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयात हिंदी विभागाच्यावतीने हिंदी दिवस तथा हिंदी अभ्यास मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप गोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर जिल्हा नांदेड येथील हिंदी विभागप्रमुख डॉ. दीपक पवार हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री योगानंद महाराजांच्या प्रतिमापूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर गाडे यांनी केले.यावेळी प्रमुख अतिथी डॉ. दीपक पवार आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की –
“हिंदी, हिंदू ,हिंदुस्तान, इस संसार के रत्न महान।
हिंदी मेरी माता है, हिंदू मेरा धाता है।
हिंदुस्तान मेरी जान है शान है।
इन तीनों रत्नों के लिए तन, मन, धन कुर्बान है।”भारतासारख्या विशाल व बहुभाषिक व बहुसांस्कृतिक देशात विविधतेमध्ये एकता ही आपली खरी ओळख आणि सर्वात मोठी ताकद आहे. हिंदी ही आपल्या देशाची राजभाषा व संपर्कभाषा असून या भाषेमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागातील, भाषेतील लोकांना संवादाच्या माध्यमातून एकाच धाग्यात बांधण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. हिंदी भाषा भारताच्या बाहेरील जवळपास २० देशांमध्ये बोलली जाते. आज आपल्या देशामध्ये वैद्यकीय व अभियांत्रिकीचे शिक्षणसुद्धा बऱ्याच संस्थांमध्ये हिंदी माध्यमातून होत आहे. एम.बी.बी.एस. व बी. टेक ची पुस्तके सुद्धा हिंदी भाषेतून येत आहेत. आज केवळ एकाच भाषेचे ज्ञान असलेला युवक ज्ञानी नाही तर जो विद्यार्थी जास्तीत जास्त भाषांचे ज्ञान आत्मसात करील तोच आपले जीवनमान सुधारून उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. आज भारतातील वेगवेगळ्या कार्यालयामध्ये हिंदी भाषेमधून व्यवहार होताना दिसून येतो. आज सिनेमा, प्रिंट मीडिया, जाहिरात, भाषांतरण आणि डिजिटल प्लेटफार्ममुळे हिंदी भाषेचा विस्तार होत असलेला दिसून येतो. ज्यामुळे या भाषेमध्ये रोजगारांच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या दिसून येतात. आज भारताची प्रमुख भाषा हिंदी असल्यामुळे वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या भारताच्या बाजारपेठेमध्ये आपल्या उत्पादित वस्तू आणि सेवांना हिंदी भाषेचा आधार घेऊन या भाषेमध्ये जाहिरातींची निर्मिती करून प्रचार – प्रसार करून खप वाढवतांना दिसून येतात.
यावेळी हिंदी अभ्यास मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अध्यक्ष-पंकज बंडे, उपाध्यक्ष-कु.श्रद्धा गडगिळे, सचिव-कु. तेजल झुंजुर्डे, सहसचिव-कु. प्राची कऱ्हाळे,कोषाध्यक्ष- दाजीबा मात्रे, सदस्य-कु.निकिता अन्नपूर्वे,कु. ऋतुजा बोखारे, संपादक-कु. ऐश्वर्या पुरी, कु. पल्लवी लोणारे, कु. सानिका दळवी इत्यादी सत्कार करण्यात आला.यावेळी कु. आकांक्षा दळवी व कु.तेजल झुंजुर्डे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप गोरे यांनी केला. डॉ. गोरे यावेळी म्हणाले की, हिंदी भाषा ही देशाची राष्ट्रीय भाषा आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आल्यानंतर हिंदी विषयाच्या प्राध्यापकांसोबत याच भाषेतून संवाद साधून आपले संवादकौशल्य परिपक्व करून हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवले पाहिजे. जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यात जाल त्यावेळी तुम्हाला या भाषेचा उपयोग करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला संवाद करताना कोणतीही अडचण उद्भवणार नाही.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. सानिका दळवी यांनी केले. तर आभार कु. पल्लवी लोणारे या विद्यार्थिनींनी मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी हिंदी विभागाच्या प्रा. डॉ रत्नमाला धुळे, डॉ.गौतम कांबळे, डॉ.परशुराम पाटील,प्रा. ऋषिकेश घोरपडे, डॉ. अस्मिता बंगाळे,डॉ. मंगल जाधव व इतर प्राध्यापक तथा विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button