लिटल किंग्ज शाळेच्या बालदिंडीने वसमत शहर झाले भक्तिमय
महाराष्ट्रातील संतांच्या जिवंत देखाव्यांनी वसमतकरांनी अनुभवला पंढरपूरचा आनंद

वसमत / प्रतिनिधि
आषाढी एकादशीचे औचित्य साधत लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालय, वसमत यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वसमत शहरातून भव्य वारकरी बालदिंडी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. विशेष म्हणजे, यंदाचे हे १९ वे वर्ष असून या परंपरेने वसमत शहर पुन्हा एकदा विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले.
शाळेतील सुमारे दोनशे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हातात भगव्या पताका, टाळ, मृदुंग, वीणा, घुंगरू काठी, झांज आदी पारंपरिक वाद्यांसह दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
सकाळी ९ वाजता वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम निरदोडे साहेब तसेच नगर परिषद वार्ड क्रमांक १५ च्या नगरसेविका सौ. जयमाला धनंजय गोरे यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भक्तिमय वातावरणात दिंडीला प्रारंभ झाला.

या दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेले विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, संत जनाबाई, संत गोरा कुंभार तसेच महाराष्ट्रातील इतर संतांचे जिवंत देखावे. या देखाव्यांनी वसमतकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि क्षणभर शहरातच पंढरपूर अवतरल्याचा आनंद नागरिकांनी अनुभवला.
दिंडी मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले तसेच विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. संपूर्ण दिंडीदरम्यान शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत राहून शिस्तबद्ध पथसंचलन केले.
ही पालखी गवळी मारुती मंदिर, मामा चौक, झेंडा चौक, शहर पोलीस स्टेशन मार्गे पुन्हा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे येऊन भक्तिमय वातावरणात विसर्जित करण्यात आली.
या अनोख्या वारकरी बालदिंडीच्या माध्यमातून लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरा, संस्कार, भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याची मूल्ये रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला असून या उपक्रमाचे वसमत शहरातून सर्वत्र कौतुक होत आहे.