महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ वेदमूर्ती श्री. उमेश अनंतमहाराज टाकळीकर यांना जाहीर झाला आहे.
कार्यकारी संपादक - नागेश चव्हाण

परभणी ता.10
प्राचीन भारतीय संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि गुरुकुल शिक्षण पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी समर्पितपणे कार्य करणारे श्रीसद्गुरू वेंकटेश दाजीमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र टाकळी चे संस्थानाधिपती वेदमूर्ती श्री. उमेश अनंतमहाराज टाकळीकर गेल्या चार दशकांहून अधिक काळ अविरत वेदाध्यापन, गुरुकुलाची उभारणी, गोरक्षण आणि विविध सामाजिक-धार्मिक उपक्रम राबविलेले आहेत.
ऋग्वेद संहिता, शिक्षा चतुष्टय, अष्टाध्यायी, तर्कसंग्रह, ऐतरेय ब्राह्मण, आरण्यक, पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ ते घनपाठ आणि श्रौत-निरुक्त-गृह्यसूत्र-ऋग्वेद कर्मकांड अशा षडंगांसहित संपूर्ण वेदाध्ययन त्यांनी पूर्ण केले. वे.शा.सं. काशीनाथशास्त्री जोशी गुरुजी (शंकराचार्य मठ, सातारा), वेदमूर्ती गजानन अनंत भागवत गुरुजी, वेदमूर्ती विनायकभट्ट सीतारामभट्ट आठल्ये गुरुजी (वेदशाळा, रत्नागिरी) आणि वेदमूर्ती प्रभाकर दत्तंभट्ट कोडणीकर गुरुजी यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
रत्नागिरी, बासर,सातारा (आंध्रप्रदेश) आणि पुणे येथेही गुरुकुलाच्या शाखा यशस्वीपणे चालवून वेदविद्येचा प्रसार केला. त्यांचे गुरुकुलात ५०० हून अधिक शिष्यांनी अध्ययन केले आहे. गुरुकुलात त्यांनी वैदिक शिक्षणासोबतच शालेय व आधुनिक शिक्षणाची सांगड घालून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला.
त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने वेदमूर्ती विभागात श्री.उमेश महाराज टाकळीकर यांना महाकवी कालिदास साधना पुरस्कार जाहीर केला आहे.
यामुळे संस्कृत, वेदाध्यायी, वैदिक ,शैक्षणिक क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



